
वारंवार वादग्रस्त विधाने करून तेढ निर्माण करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच खडसावले होते. त्यानंतरही आज अहिल्यानगर येथे निघालेल्या रॅलीमध्ये आमदार पडळकर पुन्हा एकदा बरळले. नाव न घेता टीका करताना ‘डुकरे’, ‘बांडगुळं’ अशा शब्दांसह शिव्यांचा वापर त्यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज अहिल्यानगरमध्ये ‘शिवशक्ती-भीमशक्ती मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामुळे शहरातील मुस्लिमबहुल भागांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अनेक ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.
या मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा नाव न घेता हल्ला चढवत, ‘बांडगुळं जर वळवळणार असतील तर हिंदू ठेचून काढणार. यात गैर नाही. हिंदुस्थानविषयी प्रेम नसेल तर त्यांनी देशातून निघून जावं; अन्यथा आम्ही त्यांच्या ढुंगणावर लाथ मारून घालवू,’ असे विधान केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ‘जो या देशाचा, धर्माचा अपमान करेल, त्याला हिंदू पोरं आता सोडणार नाहीत. ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा संतापजनक इशारा त्यांनी दिला.
अहमदनगरसह औरंगाबाद, उस्मानाबाद, इस्लामपूर या शहरांची नावे बदलल्याचे सांगत, ‘भारतीयांवर आक्रमण करणारे निजाम, औरंगजेब यांसारखे लोक तुमचे हीरो कसे होऊ शकतात?’ असा सवाल त्यांनी केला.
आमदार संग्राम जगताप यांनीही पक्षाने दिलेल्या नोटिशीची पर्वा न करता भाषणात मुस्लिम समाजाबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी म्हटलं, ‘जेव्हा आमच्यावर फतवे काढले जातात की, हिंदूंकडून खरेदी करू नका, तेव्हा आम्ही आमची भूमिका मांडली तर त्यात गैर काय? आम्ही भिणारे नाही. आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेऊ,’ अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.