सावधान…महामंदी येणार, सोने-चांदीच तारणार; रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा

‘रिच डॅड पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी अनेकदा सोने-चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काळात सोने-चांदी आणि बिटकॉइन हेच सर्वसामान्यांचा आणि अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असतील, असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी जगात महामंदी येणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. तसेच या काळात सोने-चांदीच आपल्याला तारणार असल्याने त्यांनी गुंतवणूकदारांना सोने आणि चांदी तसेच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ हल्ले सुरूच आहेत आणि जागतिक व्यापार युद्धासारख्या परिस्थितीत सोने आणि चांदीच्या किमती विक्रम मोडत आहेत. तसेच ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागितक शेअर बाजार मंदीत आहेत. या पार्श्वभूमीवर रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी एका पोस्टमध्ये इशारा दिला आहे की या वर्षी जागतिक इतिहासातील सर्वात मोठी महामंदी येत आहे. या काळात आर्थिकदृष्ट्या स्थैर्य हवे असेल तर सोने-चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या मागील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या ‘रिच डॅड्स प्रोफेसी’ या पुस्तकात, मी जागतिक इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी केली होती आणि आता वेळ आली आहे. या वर्षी मोठी महामंदी येणार आहे. मी लोकांना सोने-चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहे. महामंदीच्या संकटाच्या आणि कठीण काळात हा एकमेव आधार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

रॉबर्ट कियोसाकी यांनी या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी वर्षानुवर्षे सांगत आहे बँकेत आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करणारे तोट्यात आहेत. महागाईमुळे अनेकांनी वाचवलेले पैशांचे मूल्य कमी होत आहे. त्यामुळे मी वर्षानुवर्षे सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करा असे सांगत आहे. बिटकॉइनला नेहमीच सर्वात महत्त्वाची मालमत्ता मानणारे कियोसाकी आता या मालमत्तांसह दुसऱ्या क्रिप्टो, इथरियममध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत आणि त्याला फायदेशीर करार म्हणत आहेत.

कियोसाकी यांच्या मते, “आज माझा असा विश्वास आहे की चांदी आणि इथरियम सर्वोत्तम आहेत कारण ते मूल्याचे भांडार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते उद्योगात वापरले जातात. तर त्यांच्या किमती देखील खूपच कमी आहेत.” त्यांनी लोकांना चांदी आणि इथरियमचे फायदे आणि तोटे तसेच त्यांची उपयुक्तता अभ्यासण्याचे आवाहन केले आणि नंतर त्यांच्या आर्थिक समजुतीने गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. त्यांच्या पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिले, “अशा प्रकारे, तुम्ही तुमची आर्थिक बुद्धिमत्ता वाढवून श्रीमंत होऊ शकता. स्वतःची काळजी घ्या. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी चांदीच्या वाढत्या स्थितीबद्दल चर्चा केली आणि एक धाडसी भाकित केले. त्यांनी लिहिले की चांदी सध्या $५० च्या आसपास आहे आणि नजीकच्या भविष्यात $७५ च्या पुढे जाऊ शकते. चांदी आणि इथरियम आज सर्वात जास्त मागणी असलेल्या मालमत्ता आहेत. सोने आणि चांदीबाबत रॉबर्ट कियोसाकी यांचे मागील भाकित २०२५ मध्ये खरे ठरताना दिसत आहेत. सोन्याच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली असली तरी, परताव्याच्या बाबतीत चांदीने सोन्यालाही मागे टाकले आहे.