उद्या शिवसेना भवन येथे पालिका कर्मचारी, कामगारांचा मेळावा!

युनियनने केलेल्या पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पालिकेने मान्य केल्या आहेत. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश लाभले. त्यामुळेच 15 ऑक्टोबर रोजी शिवसेना भवन येथे दुपारी 4 वाजता पालिका कर्मचारी, कामगारांचा मेळावा होणार असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत पार पडलेल्या बैठकीत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेत 5 मे 2008 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सहमती दर्शविली. पी.टी प्रक्रियेबाबत राज्य शासनाच्या अभिप्रायाची माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय एल.एस.जी.डी., एल.जी.एस., वेतनवाढ चालू करावी या मागण्यांबाबतही आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मेळाव्यास कर्मचारी, कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युनियनच्या वतीने केले आहे.