जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया पुन्हा वाढल्या असून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत सुरक्षा दलाने आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. या भागात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय आहे. त्यामुळे लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

सुरक्षा दलाच्या कारवाई दरम्यान, लष्कराचे जवान आणि पोलिसांनी वारसन परिसरातील ब्रिजथोर जंगलात दहशतवाद्यांचा एका अड्ड्याचा शोध घेतला. या कारवाई दरम्यान सुरक्षा दलांनी दोन Ak-सिरीज रायफल, चार रॉकेट लाँचर, दारूगोळ्याचा मोठा साठा आणि इतर युद्ध साहित्य जप्त केले आहेत. श्रीनगरमधील हिंदुस्थानी लष्कराला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.