‘हमास’च्या कैदेतील बिपीन जोशीचा मृत्यू, मृतदेह इस्रायलकडे सोपवला!

‘हमास’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलमधून अपहरण केलेला एकमेव परदेशी नागरिक 24 वर्षीय बिपीन जोशी याचा मृत्यू झाला आहे. गाझा शांतता करारातील अटीनुसार ‘हमास’ने बिपीनचा मृतदेह इस्रायलकडे सोपवला आहे. या हल्ल्याच्या वेळी धाडस दाखवून अनेकांचे जीव वाचवणाऱ्या बिपीनच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बिपीन जोशी हा मूळचा नेपाळचा असून कृषी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इस्रायलला गेला होता. ‘हमास’ने इस्रायलच्या हद्दीत घुसून हल्ला केला तेव्हा तो गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्झ अलुमीम शहरात होता. तिथे तो हमासच्या दहशतवाद्यांच्या हाती लागला. हल्ल्यानंतर काही दिवसांनी ‘हमास’ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये बिपीनला फरपटत रुग्णालयात नेले जात असल्याचे दिसत होते. त्यानंतर त्याची काहीच माहिती मिळाली नव्हती. तो जिवंत असेल अशी आशा होती, मात्र ती फोल ठरली. ‘हमास’ने इस्रायलकडे सोपवलेल्या 20 जिवंत कैद्यांमध्ये बिपीन जोशी नव्हता. त्याऐवजी ज्या चार लोकांचे मृतदेह हमासने इस्रायलकडे सोपवले त्यात बिपीनचा मृतदेह होता. नेपाळच्या इस्रायलमधील राजदूतांनीही यास दुजोरा दिला आहे.

जिवंत ग्रेनेड बाहेर फेकले होते!

हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये हल्ला केला. बिपीन व त्याच्या सहकाऱ्यांनी बंकरमध्ये आश्रय घेतला. दहशतवाद्यांनी फेकलेले एक ग्रेनेड या बंकरमध्ये पडले. या ग्रेनेडचा स्फोट होण्याआधीच बिपीनने ते पकडून बाहेर फेकले. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला. या प्रयत्नात तो जखमी झाला आणि दहशतवाद्यांच्या हाती लागला होता.