
>> जीवन विठोबा भोसले
मुंबई फक्त एक शहर नाही, तर स्वप्नांची नगरी आहे. या शहराची गती, लय आणि जीवनशैली जगभर परिचित आहे. कोणी म्हणतात, ‘मुंबई कधी झोपत नाही,’ पण खरी गोष्ट अशी आहे की, मुंबई झोपते; मात्र या झोपलेल्या शहराला सकाळी जागवण्याचं काम जे हात करतात, ते म्हणजे आपले वृत्तपत्र विक्रेते, या शहराचे निःशब्द पहारेकरी!
वृत्तपत्र विक्रेत्यांचा व्यवसाय साधा वाटतो, पण त्यांच्या जीवनातील त्याग, संघर्ष आणि सेवाभाव याला तोड नाही. ऊन असो वा पाऊस, थंडी असो वा वारा, परिस्थिती काहीही असो, त्यांचा एकच ध्यास असतोः ‘वाचकांपर्यंत सकाळची बातमी वेळेत पोहोचली पाहिजे.’
पहाटेचा काळ हा बहुतेक मुंबईकर झोपेत असतात. पण त्या शांततेला भेदत काही माणसं वृत्तपत्रांचे गठ्ठे खांद्यावर घेत गल्लीबोळातून फिरतात. रेल्वे स्थानकांवरून, बसस्थानकांवरून, डेपोवरून वृत्तपत्रं उचलून ही मंडळी कामाला सुरुवात करतात. थंडीने हात गारठतात, पावसात कपडे ओलेचिंब होतात, उन्हात अंगावर घाम वाहतो, तरीही त्यांच्या चेहऱयावर एकच भाव असतो, सेवा! मुंबई शहर जागं होण्याआधीच त्यांची धावपळ सुरू होते. कोणाची सायकल, कोणाची बाईक, तर कोणी पायी, पण उद्देश एकच, प्रत्येक घराच्या दारात सकाळी वृत्तपत्र पोहोचलं पाहिजे. कारण वाचक उठला की त्याच्या हातात चहा आणि वृत्तपत्र ही जोडगोळी तयार असावी, हा त्यांचा रोजचा संकल्प असतो.
मुंबईकरांच्या जीवनात वृत्तपत्राचं स्थान अमूल्य आहे. तो फक्त कागदाचा गठ्ठा नाही, तर एक सवय, एक संस्कृती, एक जीवनशैली आहे. सकाळी उठून वृत्तपत्र वाचण्याचा आनंद आजही डिजिटल युगातील स्क्रीनवर मिळत नाही. हा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम वृत्तपत्र विक्रेते निष्ठेने करतात. या निष्ठेमागे संघर्षाची कहाणी आहे. महानगरपालिकेचा आणि पोलिसांचा त्रास,
स्टॉलचे प्रश्न, आरोग्य विमा, पेन्शन, अपघात विमा, मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा अभाव, या सगळ्या अडचणींमध्येही हे विक्रेते फक्त प्रामाणिकपणा आणि वाचकांवरील विश्वास यावर उभे आहेत.
कोरोनाच्या काळात तर त्यांच्या सेवेची खरी परीक्षा झाली. संपूर्ण शहर थांबले होते, रस्ते ओस पडले होते, पण वृत्तपत्र विक्रेते थांबले नाहीत. भीतीच्या सावटातही त्यांनी जीव धोक्यात घालून वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचवली. काही जण आजारी पडले, काहींनी जीव गमावला, तरीही सेवा खंडित झाली नाही.
शासनाने ‘वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ’ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज इतकी वर्षे उलटली तरी ते मंडळ स्थापन झालेले नाही. दररोज पहाटे आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी झटणारा हा विक्रेता आज स्वतःच प्रश्न विचारतो, आपल्या हक्काच्या कल्याणकारी मंडळासाठी अजून किती पहाट पाहायच्या? हा प्रश्न केवळ त्यांच्या ओठांवर नाही, तर त्यांच्या कष्टाळू हातात आणि थकलेल्या डोळ्यांत दिसतो. शासनाने आता तरी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. हाच त्यांच्या शतकोत्तर सेवेचा खरा सन्मान ठरेल.
भारतभरातील तसेच महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेते हे या सेवेचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांचे कार्य केवळ वृत्तपत्र विक्रीपुरते मर्यादित नाही, तर समाजाला माहिती, शिक्षण आणि जागरुकता देण्याच्या कार्याचा तो अविभाज्य भाग आहे. आपल्या एकत्र प्रयत्नातून आपला वृत्तपत्र व्यवसाय अधिक बळकट, आधुनिक आणि प्रतिष्ठत होवो, हीच शुभेच्छा!
प्रेरणेचा दीपस्तंभ
भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर. याच दिवशी देशभरात ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ साजरा केला जातो. कलाम साहेबांनी आपल्या बालपणी वृत्तपत्र वाटण्याचं काम केलं होतं. त्यांनी स्वतः सांगितले होते, ‘मी वृत्तपत्र वाटत असताना शिकलो की, वेळ पाळणे, जबाबदारी घेणे आणि प्रामाणिक राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.’
ही वाक्ये प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्यासाठी प्रेरणादायी आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन कार्यात नवी उमेद, नवी ऊर्जा आणि नवा विश्वास घेऊया.
आपल्या घराच्या दारात रोज सकाळी वृत्तपत्र ठेवणारा तो माणूस फक्त ‘पेपरवाला’ नाही, तर आपल्या दिवसाची सुरुवात घडवणारा खरा सेवक आहे, असेच वाचक आणि समाजानेदेखील समजावे आणि या निःशब्द सेवेचा आदर करावा, त्यांच्या कष्टाचा मान राखावा आणि त्यांच्या सन्मानासाठी नेहमी उभं राहावं, हीच खरी कृतज्ञता ठरेल. समाजाने त्यांच्या कामाची जाणीव ठेवावी आणि प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याला आदराने ‘धन्यवाद’ म्हणावं, हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक आहे.