
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या 91 व्या हंगामाचा थरार बुधवारपासून सुरू होतोय. यावेळी ऋषभ पंतच्या संभाव्य पुनरागमनासह अनेक नव्या प्रतिभावान खेळाडूंवरही साऱयांचे लक्ष केंद्रित असेल. या हंगामात अनुभवी खेळाडूंच्या सातत्यावर आणि नवोदित खेळाडूंच्या चमकदार कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेटमधील संतुलन राखण्यासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार असून तरुण व अनुभवी दोन्ही गटांतील खेळाडू आपली क्षमता सिद्ध करण्यास सज्ज आहेत.
पंतच्या पुनरागमनाची उत्सुकता
जुलै महिन्यातील मँचेस्टर कसोटीनंतर झालेल्या दुखापतीमुळे ऋषभ पंत मैदानाबाहेर होता. दिल्ली संघात त्याची पहिल्या टप्प्यात निवड झालेली नसली तरी ‘बीसीसीआय’च्या फिटनेस अहवालानुसार तो दुसऱया टप्प्यात परतण्याची शक्यता आहे. रणजी करंडक स्पर्धा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेपूर्वी खेळाचा अनुभव घेण्याची ही मोठी संधी असेल.