हिंदुस्थानी तरुणाचा अमेरिकेत गोळीबारात मृत्यू, ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा

हिंदुस्थानी तरुणाचा अमेरिकेत गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मयत तरुण हरियाणातील करनाल येथील हथलाना गावातील रहिवासी होता. प्रदीप असे मयत तरुणाचे नाव असून तो अमेरिकेतील पोर्टलँड शहरात राहत होता. प्रदीप दीड वर्षांपूर्वीच नोकरीनिमित्त अमेरिकेत गेला होता. शनिवारी एका माथेफिरु अमेरिकन तरुणाने प्रदीपवर गोळी झाडल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली.

प्रदीप पोर्टलँड शहरात एका दुकानात काम करत होता. शनिवारी एक तरुण दुकानात आला आणि त्याने प्रदीपवर गोळीबार केला. यानंतर हल्लेखोराने स्वतःवरही गोळी झाडली. या गोळीबारात प्रदीपचा मृत्यू झाला. प्रदीपचा आठ वर्षापूर्वीच विवाह झाला होता. दीड वर्षापूर्वी लाखोंचं कर्ज घेऊन कुटुंबीयांनी प्रदीपला अमेरिकेत पाठवले होते. या घटनेमुळे प्रदीपच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रदीपचा मृतदेह लवकरात लवकर हिंदुस्थानात आणण्यासाठी कुटुंबीयांनी सरकारकडे विनंती केली आहे.