
ऐन दिवाळीत मुंबईतील अनेक भागांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतानाही अनेक भागांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शीव प्रतीक्षानगर, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व, गोराई या भागांतील कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ाचा सामना करीत आहेत. सणासुदीच्या दिवसांतही प्रशासन समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला अनेक भागांत पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील अनेक भागांत कित्येक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शीव प्रतीक्षानगर परिसरातही गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱया कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचशील नगर, प्रतीक्षा नगर, जीटीबीचा परिसर या भागांतील नागरिकांना अक्षरशः टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.