
पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान बांधकाम सुरू असलेल्या जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. टर्मिनसवर अतिरिक्त दोन प्लॅटफॉर्मचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे येथील एकूण प्लॅटफॉर्मची संख्या पाच होणार असून अधिक मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक करण्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे प्रमाण वाढले आहे. त्या गाडय़ांचा मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनसवर ताण येत आहे. तो ताण कमी करण्यासाठी जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात टर्मिनस इमारतीसह तीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम केले जात आहे. हे काम सुरू असतानाच अतिरिक्त दोन प्लॅटफॉर्मचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने विचारात घेतल्याचे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अतिरिक्त प्लॅटफॉर्मचे काम दुसऱया टप्प्यात केले जाणार आहे. सध्या त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील तीन प्लॅटफॉर्मच्या बांधकामासाठी 69 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. बांधकामाला उशीर होत असल्याने तो खर्च 80 कोटींपर्यंत वाढेल, तर अतिरिक्त प्लॅटफॉर्मच्या बांधकामावर साधारण 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांकडून समजते. अतिरिक्त प्लॅटफॉर्मच्या बांधकामांमुळे मुंबईतील अन्य तीन टर्मिनसवरील ताण मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकतो, असे वाहतूकतज्ञांचे मत आहे.
पहिल्या टप्प्याची डेडलाईन वाढवली!
जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे बांधकाम दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील तीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट होते. तथापि, या अवधीत काम पूर्ण करणे अशक्य असल्याने आता मे 2026 ची नवीन डेडलाईन रेल्वे प्रशासनाने निश्चित केली आहे. त्यामुळे जोगेश्वरी टर्मिनसची स्वप्नपूर्ती लांबणीवर पडली आहे. धिम्या कामामुळे प्रकल्पाचा खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची शक्यता वाहतूकतज्ञांनी वर्तवली आहे.