शिवसैनिकांनी बीडमधील धर्मांतराचा डाव हाणून पाडला, दोघे पोलिसांच्या ताब्यात; कसून चौकशी सुरू

मिशनऱ्यांकडून भोळय़ाभाबडय़ा अशिक्षित नागरिकांना आमिष दाखवून धर्मांतर करायला भाग पाडण्याचा प्रयत्न शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनायक मुळे आणि इतर शिवसैनिकांनी हाणून पाडला. शिवसैनिकांनी जाब विचारताच मिशनरींचे काम करणाऱ्यांची बोबडी वळली. शिवसैनिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी त्या दोघांना अटक करून त्यांचे मोबाईल आणि सर्व माहिती जप्त केली आहे.

वडवणी येथील अहिल्यानगर भागातील एका घरात दोन ख्रिश्चन तरुण निरक्षर आणि असुशिक्षित लोकांना काही दिवसांपासून समुपदेशन आणि मन एकाग्र राहण्यासाठी योगा शिकवण्याच्या नावाखाली त्यांचा ब्रेनवॉश करत असल्याचे समोर आले.

या प्रकाराची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनायक मुळे यांना मिळाली. त्यांनी तातडीने वशिष्ट शेंडगे, अतुल मस्के, शहाजी लोकरे, माऊली निपटे या आपल्या शिवसैनिकांसह त्याठिकाणी दाखल होत धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला. शिवसैनिकांनी जाब विचारताच त्या दोन्ही ख्रिश्चन समुदायातील तरुणांची बोबडी वळली. शिवसैनिकांनी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा भ्रमणध्वनी आणि त्यांच्याजवळ असणारे सर्व कागदपत्रे घेऊन कसून चौकशी सुरू आहे. हा धर्मांतराचाच प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

महिला कुंकू लावेनात, माणसं अंत्यविधीला जाईनात

शिवसैनिकांनी धर्मांतराचा हा कट उधळून लावल्यानंतर त्या भागात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन-तीन वर्षांपासून ज्या निरक्षर लोकांचे ब्रेनवॉश करण्यात आले ते लोक आता अंत्यविधीलाही जाईनात. महिला पूर्वी कुंकू लावत होत्या, त्या आता कुंकूही लावेनाशा झाल्या आहेत. हिंदू समुदायामध्ये मिसळणेही कमी झाल्याची माहिती मिळाल्याचे तालुकाप्रमुख विनायक मुळे यांनी सांगितले.