
हिंदुस्थानचा 23 सदस्यीय युवा बॉक्सिंग संघ तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी बहरीनची राजधानी मनामा येथे रवाना झाला आहे. या स्पर्धांचा शुभारंभ 23 ऑक्टोबरपासून होणार असून हिंदुस्थानी खेळाडू या मंचावर आपली ताकद दाखवण्यास सज्ज झाले आहेत.
या संघात अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी कामगिरी करणारे ध्रुव खरब, उधमसिंह राघव, खुशी चंद, अहाना शर्मा आणि चंद्रिका भोरशी पुजारी यांसारखे प्रतिभावान खेळाडू सामील आहेत. तसेच जुलै 2025 मध्ये झालेल्या आशियाई अंडर-17 चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानने गाजवलेल्या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती करण्याची या संघाकडून अपेक्षा आहे. त्या स्पर्धेत हिंदुस्थानने तब्बल 43 पदके जिंकत एकूण गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले होते. संघाची निवड या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सहाव्या अंडर-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील कामगिरीच्या आधारे करण्यात आली. सुवर्णपदक विजेत्यांना थेट संघात स्थान देण्यात आले, तर रौप्यपदक विजेत्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली.
हिंदुस्थानचा संघ अंडर-17 वयोगटातील 14 वजन गटांमध्ये आपली दमदार आव्हानं उभी करणार आहे. यामध्ये मुलगे आणि मुली प्रत्येकी सात-सात वजन गटांमध्ये खेळणार आहेत. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ हिंदुस्थानने सांगितले की, ही युवा खेळाडूंची पिढी भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन्स घडवेल. त्यांच्या खेळात दम, शिस्त आणि जोश या तिन्ही गोष्टींचा मिलाफ आहे.