
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पापाडा परिसरात अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गापासून आप्पापाडा हे अंतर जास्त असल्याने नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. या पार्श्वभूमीवर या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि पालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी 13.4 मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता तत्काळ प्रत्यक्षात आणावा. या रस्त्याला अत्यावश्यक नागरी प्रकल्प घोषित करावे, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आप्पापाडा परिसरात होणारी वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी बोरिवली, लोखंडवाला काॅम्प्लेक्स या भागात जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर रस्ता असणे खूप गरजेचे आहे. तसेच आप्पापाडा, गोपुळ नगर इत्यादी परिसरात पोयसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे कामदेखील सुरू आहे. हा प्रकल्प जरी सुरू असला तरी काही सांडपाणी प्रक्रिया संयंत्रचे (एसटीपी) काम हे केवळ तेथे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने सुरू करता येत नाही, त्या अनुषंगाने आवश्यक इंटरसेप्टर, मलनिस्सारण वाहिन्या इत्यादीची कामे होणे, त्याचे परिरक्षण होणे गरजेचे आहे.
वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार
या पार्श्वभूमीवर आप्पापाडा नर्सिंग होम ते पोयसर नदी यामधील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता, अत्यावश्यक नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हा रस्ता व्हायटल प्रोजेक्ट घोषित केल्यास पालिकेच्या महत्त्वाच्या कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच आप्पापाडा परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी खूपच मदत होईल, असे सुनील प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे.