अग्निशमन दलाची जिगरबाज कामगिरी, जोगेश्वरीच्या आगीतून 27 जणांना वाचवले

जोगेश्वरी पश्चिम येथील ‘जेएमएस’ बिझनेस सेंटरमध्ये आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत पालिकेच्या अग्निशमन दलाने जिगरबाज कामगिरी करीत तब्बल 27 जणांचे प्राण वाचवले. या गगनचुंबी इमारतीच्या 9 ते 12व्या मजल्यावर ही आग भडकली होती. अचानक लागलेल्या या आगीमुळे अडकलेले लोक मदतीसाठी प्रचंड आरडाओरडा करीत असताना तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने तब्बल 27 जणांची हायड्रोलिक प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने सुखरूप सुटका केल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.   

जोगेश्वरी पश्चिमच्या एसव्ही रोड, बेहराम बाग, गांधी हायस्कूलजवळ ‘जेएमएस’ ही ग्राऊंड प्लस 13 मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक कार्यालये आहेत. काचेने आच्छादीत असलेल्या या इमारतीमध्ये सकाळी 10 वाजून 51 मिनिटांनी आगीची ठिणगी पडली. या ठिकाणचे लाकडी सामान, वायरिंग, कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य, सामानामुळे काही क्षणातच आग भडकली. आगीची तीव्रता इतकी होती की तासाभरातच आग ‘लेव्हल-3’ म्हणजेच अत्यंत जोखमीची झाल्याचे जाहीर करण्यात आले. आगीचे लोळ आणि धूर 9 ते 12व्या मजल्यापर्यंत पसरले. आगीत अडकलेल्या लोकांना धुराचा त्रास झाला. या वेळी अग्निशमन दलाने अत्यंत वेगाने कामगिरी करीत आगीत अडकलेल्या सर्व 27 जणांची सुटका केली. यातील 17 जणांना धुराचा त्रास झाला. त्यांना उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यातील आठ जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 9 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

फायर फायटिंग सिस्टम बंद, पालिका नोटीस बजावणार 

‘जेएमएस’ ही बहुमजली इमारत असूनही या इमारतीमध्ये फायर फायटिंग सिस्टीम नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका संबंधित आस्थापनाला कायदेशीर नोटीस बजावणार आहे. यामध्ये फायर फायटिंग सिस्टम कार्यान्वित करण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात येणार असून कार्यवाही केली नसल्यास वीज-पाणी तोडण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपासही अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.