
मराठमोळी संस्कृती जपत भायखळ्याच्या महिला कारागृहात दिवाळी पहाटचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. कैदी महिलांनीदेखील सहभागी होत आपल्यात दडलेल्या गायिकेची चुणूक दाखवून दिली. ‘आली दिवाळी…कानडा राजा पंढरीचा… तू सुखकर्ता… संदेसे आते है… आणि जय जय महाराष्ट्र माझा…’ अशा भावगीत, भक्तीगीतांच्या हिंदोळ्यावर कारागृहात सुरांची बरसात झाली. सोबतीला चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या व लाडू, नानकटाईने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
भायखळा जिल्हा व महिला कारागृहाचे अधीक्षक विकास रजनालवार यांनी कैदी महिला व त्यांच्या मुलांसाठी बुधवारी ‘दिवाळी पहाट’चा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सर्व कैदी महिलांनी त्यांच्या पाल्यांसह आवर्जून उपस्थिती लावत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी सर्वांना दिवाळी फराळदेखील देण्यात आला. चकल्या, चिवडा, करंज्या, शंकरपाळ्यांवर कैदी महिला व त्यांच्या मुलांनी ताव मारला.
कैदी महिलांसाठी ‘गांधी विचार’ या विषयावर एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या कैदी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप चव्हाण, संतोषी कोळेकर तसेच तुरुंगाधिकारी गणेश चौधरी, भगवान मंचरे उपस्थित होते.
कैद्यांनाही हा आनंदाचा सण साजरा करता यावा याकरिता आम्ही खास त्यांच्यासाठी ‘दिवाळी पहाट’चा कार्यक्रम आयोजित केला होता. शिवाय सर्वांना फराळदेखील देण्यात आला.
■ विकास रजनालवार, अधीक्षक (भायखळा कारागृह)
























































