स्वागत दिवाळी अंकांचे

 

दर्याचा राजा

‘दर्याचा राजा’चा यंदाचा 18 वा दिवाळी अंक दर्जेदार कथा, कविता, लेखमाला, बाल विभाग, भक्ती विभाग, मत्स्य विभाग, आरोग्य, वात्रटिका, कला-क्रीडा इ. विविधांगी भरगच्च साहित्याने नटला आहे. मधू मंगेश कर्णिक, माधवी पुंटे, प्रा. प्रतिभा सराफ, अशोक लोटणकर, रजनी अपसिंगेकर, अनंत गुरव, श्रीकांत आंब्रे आदींच्या कथा व अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर, सदानंद डबीर, कमलाकर राऊत, शिवाजी गावडे, संजय तामोरे, जनार्दन पाटील इ. च्या कविता, रविप्रकाश पुलकर्णी, पंढरीनाथ तामोरे, प्रा. हेमंत सामंत, प्रवीण दवणे, हरेश्वर मर्दे, वीरेंद्र चित्रे, ज्योती कपिले, एकनाथ आव्हाड, प्रमोद कांदळगावकर यांचे खास लेख ही वैविध्यपूर्ण साहित्यांची मेजवानी आहे. मुखपृष्ठ श्रीकांत तरे यांचे आहे.

संपादक : पंढरीनाथ तामोरे

पृष्ठे : 204, मूल्य : रु. 125/-

 

 प्रतिभांगण

ग्रंथाली प्रकाशनाद्वारे ‘काहीतरी विशेष’ या संकल्पनेअंतर्गत अपंगत्वावर मात करीत पुनर्वसन झालेल्यांच्या यशोगाथा सांगणारा हा दिवाळी अंक. मागील वर्षी याच विषयाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने विशेषत्व असेच राखीत हा विषय घेण्यात आला आहे. अंकातील सर्वच यशोगाथा प्रेरणा देणाऱ्या. या यशोगाथा असल्या तरी एका अर्थाने संघर्षगाथाच म्हणायला हव्यात. ‘समावेशकता आणि समानता’ या संकल्पना अपंगत्वाला सहाय्यभूत ठरल्या तर खूप चांगले बदल घडू शकतात हेच या अंकातील गाथा आपल्याला सांगातात. या अंकातील सर्वच लेख वाचनीय आणि स्पृहणीय आहेत. सुनंदा भोसेकर, शोभा नाखरे, मेध आलकरी, राणी दुर्वे यांचे लेख आवर्जून वाचावेत असे. सोबत अपंगत्वावर मात करताना पुनर्वसनाबाबत माहिती देणारे, समस्या आणि उपाय सांगणारे लेखही मार्गदर्शक ठरणारे आहेत.

संपादक : सुधा हुजूरबाजार – तुंबे

पृष्ठे : 107, मूल्य : 200 रुपये

 

अंतरीचे प्रतिबिंब  

आगळ्यावेगळ्या साहित्याचा लक्षवेधी कथा विशेषांक. यंदा या अंकात  नामवंतांच्या कथा आणि मराठी साहित्यातील सशक्त कथा प्रवाहांची वैशिष्टय़े उलगडून सांगणारे विशेष लेख तसेच मराठी कथा विश्वाचा सांगोपांग आढावा घेण्यात आला आहे.  वर्तमान घडामोडींचे भान राखणाऱ्या या कथा विशेषांकात विवेक मेहेत्रे यांची आगळीवेगळी चित्रकथा, प्रशांत पुलकर्णी  यांची खुमासदार व्यंगचित्रे आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसाराम लोमटे, महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते किरण येले, साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते देविदास सौदागर, श्रीकांत बोजेवार, हेमंत कर्णिक, अशोक राणे, अशोक बागवे, निरंजन घाटे, सतीश तांबे, पंकज पुरुलकर, नीलेश मालवणकर, विजयराज बोधनकर, मुकेश माचकर, डॉ. मुकgंद पुळे या मान्यवरांच्या कथा आहेत. सोबत माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मिलिंद बोकील, डॉ. अविनाश कोल्हे अशा नामांकित लेखकांचे कथाविषयक वैविध्यपूर्ण लेख आहेत.

संपादक : प्रज्ञा जांभेकर

पृष्ठे : 390,  मूल्य : 400 रुपये

 

मी कर्मयोगी

‘मी कर्मयोगी’ हा पर्यावरण विशेषांक. सध्या पर्यावरणाबाबत आपण समोर जे प्रश्न उभे केले आहेत त्याबाबत जागरूक होण्याची वेळ आली आहे. विकासाचा मार्ग पर्यावरणाचे नुकसान करून जात नाही हे सांगू पाहणारा हा अंक मुंबईच्या विकासाच्या मॉडेलवर भाष्य करतो. ‘मुंबई कोस्टल फॉरेस्ट – हरित भविष्याची नवी आशा’ या कव्हरस्टोरीच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील हरित अंश टिकवून ठेवणाऱ्या मॉडेलबाबत माहिती दिली आहे. हवामान बदल, हरित उद्योग, सस्टेनेबल जीवनशैली, आर्टिफिशल इंटेलिजन्स वापर आणि जबाबदारी असे अनेक महत्त्वाचे विषय मांडणारे लेख अंकात समाविष्ट आहेत. पर्यावरणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणारा अंक वैशिष्टय़पूर्ण म्हणावा लागेल.

संपादक : राजेश कोकम

पृष्ठे : 56, मूल्य : 100 रुपये