आता ‘नाविक’ बनणार तुमचा वाटाड्या, गुगल मॅपप्रमाणे नवे स्वदेशी अ‍ॅप लवकरच

लवकरच  हिंदुस्थानींच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये नाविक हे स्वदेशी नेव्हिगेशन अ‍ॅप बसवले जाईल. प्रत्येकाच्या पह्नमध्ये गुगल मॅपप्रमाणे नाविक अ‍ॅप इन बिल्ट करावे, असा नियम सरकारतर्फे लागू केला जाण्याची शक्यता आहे. मात्र नाविक अ‍ॅप गुगल मॅपच्या जागी असेल की गुगल मॅपला पर्याय असेल हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

गुगलसह अनेक अ‍ॅपचे सर्व्हर देशाबाहेर आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वाटेल तसा हिंदुस्थानी डेटा वापरण्याची परवानगी मिळते. त्यामुळे सुरक्षेबद्दल चिंता निर्माण होते. हिंदुस्थानी डेटा देशाबाहेर जाऊ नये, यादृष्टीने पावले उचलण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. अन्य काही उपाययोजनाही केल्या जात आहेत. याअंतर्गत प्रत्येक सर्व्हरसाठी देशी बनावटीची चिप असणे अनिवार्य करणे समाविष्ट आहे. एवढेच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बसवलेली प्रत्येक चिप हिंदुस्थानी असेल. यासाठी नियमदेखील विकसित केले जात आहेत. सर्व डेटाचे सुरक्षित ऑडिट केले जात आहे. याच उपाययोजनांच्या अंतर्गत रेल्वे नेव्हिगेशनसाठी लवकरच मेपलसोबत सामंजस्य करार केला जाऊ शकतो.