आजपासून परिवहन कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कात्रीत अडकला पदोन्नतीचा आदेश

परिवहन विभागातील कर्मचाऱयांची कालबद्ध पदोन्नती व विभागीय पदोन्नती आदेश काढण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यावर यासंदर्भातील आदेश त्वरित काढण्यात येतील असे आश्वासन परिवहन आयुक्तांनी प्रताप सरनाईक यांच्या आरटीओ कर्मचारी संघटनेला दिले होते, पण अजूनही मंत्र्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रलंबित मागण्यासाठी उद्या (सोमवार)पासून परिवहन कर्मचारी बेमुदत साखळी उपोषण पुकारणार आहेत.

आकृतिबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर पदोन्नती या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या वतीने (महाराष्ट्र) सतत तीन वर्षे आंदोलन सुरू आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये तीन दिवस आंदोलन पुकारण्यात आले होते. कर्मचाऱयांच्या या आंदोलनाला यश आले

त्यात बदल्यांबाबत पूर्वीसारखीच पद्धत अनुसरण्यास प्रशासनास भाग पाडले. त्यावेळी  परिवहन आयुक्तांनी एका महिन्यात सर्व सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर तयार करून घेतो व पदोन्नतीसह इतर सर्व मागण्याही पूर्ण करतो असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कर्मचारी
संघटनेने संप स्थगित केला; परंतु प्रलंबित मागण्यांबाबत मागील वर्षभरात कोणतीच ठोस कार्यवाही केली गेली नाही, असा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे.

कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात संघटनेचे नेते विश्वास काटकर यांनी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची भेट घेतली. तेव्हा  30 सप्टेंबरपर्यंत पदोन्नतीबाबतचे सर्व आदेश जारी करण्यात येतील, असे आश्वासन परिवहन आयुक्तांनी दिले. पण हे आदेश हवेतच विरले. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱयांची अलीकडेच बैठक झाली झाली. त्यात मुंबईत परिवहन आयुक्त कार्यालयाच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषण पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनाच्या या इशाऱयाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आणि त्यांनी बैठक आयोजित केली.