
मायमराठीचा अभिमान व स्वाभिमान आपण जपला पाहिजे. नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागली पाहिजे. त्यासाठी घरात अन् महाराष्ट्रात सर्वत्र मराठीतच बोला, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
वाई तालुक्यातील एकसर येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कला स्मारकाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन सोहळय़ातही त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी अजित पवार म्हणाले, सद्यस्थितीत बहुतेकांची मुले, नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकली जातात. याप्रकरणी ज्यांना जे वाटेल ते करावे, पण घरात असेल किंवा महाराष्ट्रात सर्वत्र मराठीत बोलत राहिले पाहिजे. भविष्यात 10-20 पिढय़ांनंतर मराठी नामक एखादी भाषा होती असे सांगण्याची वेळ येऊ नये. यासाठी आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
इंग्रजी भाषा जगभरात फिरण्यासाठी लागणारी भाषा आहे. ती आलीच पाहिजे. हिंदी ही देशातील अनेक राज्यांत चालणारी भाषा आहे. ती आलीच पाहिजे. पण मराठी आपली मातृभाषा आहे. ती आपल्याला उत्कृष्टपणे बोलता आली पाहिजे. एकदा मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता आली, तर हिंदी बोलायला काही अडचण येत नाही याची पण सर्वांनी नोंद घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
पहिली ते चौथी मातृभाषेतच शिक्षण
पहिली ते चौथीपर्यंत मातृभाषेतच शिक्षण हवे. हिंदी भाषा पाचवीपासून पुढे शिकता येईल, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.




























































