खासगी बसचा हाय टेन्शन वायरला स्पर्श, भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू तर 12 जण जखमी

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागली. हाय-टेन्शन वायरला स्पर्श झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेत अंदाजे 12 कामगार गंभीर जखमी झाले. तर 3 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनोहरपूर परिसरात हा अपघात झाला. बसमध्ये पाच ते सहा गॅस सिलिंडरही ठेवले होते. आग लागल्यानंतर या सिलिंडरचा स्फोट झाला आणि बस पूर्णपणे जळून राख झाली. दरम्यान, जखमींना तातडीने उपचारासाठी विविध रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. जयपूरमधील मनोहरपूर येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनीही या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एका X पोस्टमध्ये लिहिले की, “जयपूरमधील मनोहरपूर येथे कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला हाय-टेन्शन लाईनला स्पर्श झाल्यानंतर आग लागल्याने तिघांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची बातमी दुःखद आहे. राजस्थानमध्ये दररोज होणाऱ्या या अपघांतामुळे अनेक लोक आपला जीव गमावत आहेत. हे चिंताजनक आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हीच देवाचरणी प्रार्थना करतो”, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.