
समृद्धी महामार्गावर आज मध्यरात्री आगडोंब उसळला. बोरिवलीहून छत्रपती संभाजीनगरला निघालेल्या ट्रॅव्हल्स बसला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने गाडीच्या चाकातून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने १४ प्रवासी बालबाल बचावले. या दुर्घटनेत संपूर्ण बसचा अक्षरशः कोळसा झाला.
१४ प्रवाशांना घेऊन अमृत ट्रॅव्हल्सची बस बोरिवलीवरून रात्री दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाली. ही बस मध्यरात्री अडीच वाजता समृद्धी महामार्गावरील सरलांबे गावाजवळ आली असता पाठीमागच्या टायरने अचानक पेट घेतला. चाकामधून धूर येत असल्याचे चालक हुसेन सय्यद यांच्या लक्षात येताच त्यांनी बसचा वेग कमी केला. मात्र टायर फुटला आणि आगडोंब उसळला. ही बाब चाल काने प्रवासी व वाहकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांची भंबेरी उडाली. चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या बाजूला थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत बससह आतील सामान आगीत भस्मसात झाले.
आगीवर नियंत्रण
आगीची माहिती मिळताच शहापूर पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बसचा कोळसा झाला होता. पोलि सांनी प्रवाशांना पुढील प्रवासासाठी अन्य बसने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना केले.





























































