आजारी वृद्धेच्या नशिबी झोळी यात्रा; उपचारासाठी चिखलवाट तुडवली, डहाणूच्या वरठा पाड्यातील दुर्दशा

तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर मूलभूत सुविधांअभावी दुर्दशा झाल्याचे वास्तव समोर आले आहे. रायतळी (चांदवड) वरठा पाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने एका आजारी वृद्ध महिलेला झोळीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. अक्षरशः दगड गोटे आणि चिखलबाट तुडवत ग्रामस्थांना मुख्य रस्ता गाठावा लागला. यानंतर वृद्धेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही आजपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने रुग्णांच्या नशिबी झोळी यात्रा येत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.

पालघर जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र काही आदिवासी व दुर्गम भागातील गावांमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जव्हार, मोखाडा परिसराप्रमाणेच डहाणू भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी वणवण करावी लागते. जंगली श्वापदांचा धोका असूनही मुलांना चार ते पाच किमी पायपीट करून शाळा गाठावी लागते. रस्त्याअभावी रुग्णांना अजूनही डोलीतून रुग्णालयात निण्याची वेळ येत आहे. असाच प्रकार रायतळी (चांदवड) वरठा पाड्यावर नुकताच घडला. गावातील ७० वर्षीय गंग्या वरठा या वृद्धेची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीच्या उपचाराची गरज होती. मात्र रस्ता नसल्याने रुग्णवाहिका किंवा खासगी वाहन पाड्यापर्यंत येणे शक्य नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत चादरीची झोळी तयार केली. या झोळीतून आजारी वृद्धेला चिखलातून दोन किमी पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर त्यांना वाहनातून रुग्णालयात दाखल केले.

हालअपेष्टा संपेनात
बरठा पाडा रस्त्यासाठी आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. या भागात केवळ रस्ताच नाही तर वीज व पिण्याच्या पाण्याच्याही सुविधा नाहीत. ग्रामसेवक आणि सरपंचसुद्धा दखल घेत नाहीत. आम्हाला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा संताप ग्रामस्थांनी केला