
आशियाई युवा स्पर्धेत हिंदुस्थानच्या कुस्तीपटूंनी सुवर्णयशाची झेप घेत मोहिमेचा शेवट शानदार केला. बहरीनच्या एग्झिबिशन वर्ल्ड अरेना येथे झालेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये मोनी आणि जयवीर सिंह यांनी सुवर्णपदक जिंकत हिंदुस्थानच्या पदक तालिकेत 2 सुवर्णांची भर घालत कुस्तीला सर्वात वरचे स्थान मिळवून दिले. कुस्तीच्या सात पदकांच्या जोरावर हिंदुस्थानने 13 सुवर्ण पदकांसह 47 पदके जिंकत सहावे स्थान मिळवून दिले.
जयवीरचा धडाकेबाज विजय
जयवीर सिंहने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. श्रीलंकेच्या निमेश दुलंजना आणि पंबोडियाच्या फान चान ओउ डोमला 10-0 ने धूळ चारल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या यासीन झारेझादेहला क्रायटेरिया पद्धतीने हरवले.
उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या इब्राहिम यस्ककबेकला 5-0 ने पराभूत करत जयवीरने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि जपानच्या यामातो फुरुसावाला 6-2 ने हरवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
कुस्तीच्या आखाडय़ात हिंदुस्थानचा झेंडा
17 वर्षाखालील जागतिक स्पर्धेत कांस्य जिंकणाऱया कोमल वर्माने 49 किलो गटात चीनच्या मो जियाओकिंगला 3-1 ने पराभूत करत कांस्य मिळवले, तर रचनाने 43 किलो गटात किर्गिस्तानच्या आइजान किलिचबेकोवना काबिल्बेकोवाला 11-0 ने हरवून आणखी एक कांस्य हिंदुस्थानच्या झोळीत टाकले.
 
             
		





































 
     
    



















