हैदराबादहून सोडणाऱ्या बलूनचा अहिल्यानगरमधूनही प्रवास; प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना

हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या ‘परमाणू ऊर्जा विभाग’ आणि ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांचे सहकार्य लाभले आहे.

बलून उड्डाणे हैदराबाद येथील इसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास 50 ते 85 मीटर असून, ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री 8 ते सकाळी 6.30 या वेळेत होतील. या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे 30 ते 42 किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱयाच्या दिशेनुसार ही उपकरणे 200 ते 350 किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. त्यामुळे ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील भागांमध्ये उतरू शकतात.

उपकरणे सापडल्यास पोलिसांना माहिती द्या

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, धाराशीव, परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर या जिह्यांमध्ये उपकरणे पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील, ती हलवू नयेत, उघडू नयेत किंवा छेडछाड करू नये. त्या पॅकेटवर दिलेल्या पत्त्यावर त्वरित माहिती द्यावी तसेच जवळच्या पोलीस ठाण्याला व प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

योग्य ते बक्षीस मिळणार

संशोधन संस्था अशा उपकरणांची माहिती दिलेल्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि खर्चाची भरपाई देणार आहे. या प्रयोगांविषयीची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.