एअर इंडिया आर्थिक संकटात; टाटा सन्स, सिंगापूर एअरलाईन्सकडे मागितली मदत

एकेकाळी हवाई वाहतूक क्षेत्रात ‘महाराजा’ म्हणून मिरवणाऱ्या एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी विमान कंपनीने आपल्या मालक टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे 10 हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या भीषण अपघातानंतर कंपनीची आर्थिक घडी पुन्हा कोलमडली आहे.

जूनमध्ये अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. त्यात 240 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवासी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यानंतर ‘महाराजा’च्या प्रवासी सेवेवर परिणाम झाला आहे. अपघातानंतर सरकार आणि विमान वाहतूक नियामकांनी एअर इंडियाच्या सर्व ऑपरेशन्सची सुरक्षा तपासणी अधिक कडक केली आहे. अपघातानंतर प्रवाशांचा विमान कंपनीवरील विश्वास कमी झाला आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या महसुलावर झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सेवेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने कंपनीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

n एअर इंडियामध्ये टाटा सन्सची भागीदारी 74.9 टक्के आहे, तर सिंगापूर एअरलाईन्सची भागीदारी 25.1 टक्के आहे. सिंगापूर एअरलाईन्सने टाटा समूहाच्या सोबतीने एअर इंडिया विमान कंपनीचे आधुनिकीकरण आणि आवश्यक त्या सुधारणा करण्यास तयारी दर्शविली आहे. मात्र दोन्ही कंपन्यांनी अद्याप अधिकृत निधीपुरवठयाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

n सुरक्षा व देखभाल प्रणाली तसेच अभियांत्रिकी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि केबिन क्रूचा काwशल्य विकास, तसेच ऑपरेशनल तंत्रज्ञान आधुनिक करण्यासाठी एअर इंडियाने आर्थिक मदत मागितली आहे.