
दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे तूर्त काही दिवस विश्रांती घेण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. नव्या वर्षात जनतेच्या भेटीला येणार असल्याचे आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत यांनी आज सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना ‘लवकर बरे व्हा’ अशा शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊत यांनी सकाळी आपल्या तब्येतीविषयी समाजमाध्यमांवर माहिती दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह असंख्य शिवसैनिक, पदाधिकाऱयांनी त्यांना लवकर आराम पडो, अशा सदिच्छा समाजमाध्यमावर व्यक्त केल्या.
माझ्या तब्येतीत अचानक गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याचे समोर आले आहे, असे नमूद करीत आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत पुढे म्हणतात- ‘वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यातून मी लवकरच बाहेर पडेन. तूर्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाहेर जाणे वा गर्दीत मिसळणे यावर निर्बंध आले आहेत. पण मी ठणठणीत बरा होऊन नव्या वर्षात आपल्या भेटीला येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या!’
संजय राऊत यांची पोस्ट टॅग करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून ‘मी तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतोय, लवकर बरे व्हा!’ अशा शुभेच्छा दिल्या. या पोस्टनंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
फडणवीस, बावनकुळे यांचा फोन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरून संजय राऊत यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
खरगेंचा संदेश
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पह्नवर चर्चा केली आणि प्रकृतीस्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संदेश पाठवला. ‘आमच्या लढाईतील तुम्ही एक बुलंद आवाज आहात. लवकरच आपण ‘इन अॅक्शन’ व्हाल’, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.





























































