
कारवाई केल्याच्या रागातून तर्राट टेम्पोचालकाने धिंगाणा घालत वाहतूक पोलिसांनाच मारहाण केल्याची संतापजनक घटना पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात घडली. एवढेच नव्हे तर या दारुड्याने वाहतूक पोलिसांच्या चौकीची तोडफोड करत आत्महत्या करण्याची धमकीदेखील दिली. याबाबत माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दारुड्याच्या मुसक्या आवळल्या. महेश साळुंखे असे या तर्राट माथेफिरूचे नाव आहे.
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पथकाने टेम्पोचालक महेश साळुंखे याला अडवले. त्याची तपासणी केली असता त्याने दारू ढोसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याच्यावर बडगा उगारताच संतापलेल्या महेशने गोंधळ घालण्यास सुरुवात केला. यावेळी संतापलेल्या महेशचा ताबा सुटला आणि त्याने पोलिसांना मारहाण करत चौकीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते.
ताब्यात घेत गुन्हा दाखल
कोळशेवाडी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोळशेवाडी पोलिसांनी दारुड्या महेशला ताब्यात घेत त्याच्याविरोधात दारू पिऊन वाहन चालवणे, शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण करत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
































































