मराठीतील पहिलावहिला एआय जनरेटेड दिवाळी अंक – सृजनमित्र  

पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केल्यानंतर मराठी साहित्य रसिकांची वाचन दिवाळी सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून छापील दिवाळी अंकांसोबत डिजीटल दिवाळी अंकही प्रकाशित केले जात आहेत. हीच परंपरा पुढे नेत दिवाळी अंक घडवण्यात आता एक आगळावेगळा प्रयोग करण्यात आला आहे, तो म्हणजे मराठीतल्या पहिल्यावहिल्या एआयजनरेटेड दिवाळी अंकाचा. या प्रयोगाचं नाव आहे मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांनी एकत्र निर्माण केलेला अंक. मानवाच्या कल्पनाशक्तीला कृत्रिम बुद्धिमत्तेचा हात देत त्यातून तयार झालेला हा दिवाळी अंक आहे ‘सृजनमित्र’. बोभाटा या डिजीटल व्यासपीठाद्वारे हा अंक प्रकाशित करण्यात आला आहे. ‘एआय’ला मराठी साहित्याची, संस्कृतीची, भावनांची जाण आहे का, या प्रश्नाची उत्तरे मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आल्याचे प्रकाशक सांगतात. क्लाउड सोनेट, जेमिनी प्रो, चॅटजीपीटी, ग्रूक, डीपसिक  यांसारख्या एआय मॉडेल्सचा क्रिएटिव्ह को-पायलट असा वापर करीत त्यांच्याकडून प्रॉम्प्ट लिहून घेत तयार झालेला हा अंक म्हणजे वेगळा प्रयोग आहे. योग्य वापर केल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी कल्पनाशक्तीला वेगळ्या उंचीवर नेऊ शकते, याची उदाहरणे आपण पाहात आहोतच. मात्र यानिमित्ताने साहित्यक्षेत्राला एआय पासून धोका किंवा दिवाळी अंकाच्या क्षेत्राला भीती या चर्चाही रंगतील. वाचनासोबत त्याचाही आनंद घेऊ.