मुलगा पतीसोबत असताना सासू घरात नको, हायकोर्टाने फेटाळली विभक्त पत्नीची मागणी

मुलगा पतीसोबत असताना सासू घरात नको, ही विभक्त पत्नीची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली. पिता-पुत्राच्या भेटीला न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. मी दहा दिवसांसाठी मुलाला पतीसोबत राहण्याची परवानगी देईन, पण या दहा दिवसांत सासू घरात नको. कुटुंब न्यायालयाने याच अटीवर यास संमती दिली आहे. मुलगा पित्यासोबत जाण्यास तयार नाही. तरीही कुटुंब न्यायालयाने पिता-पुत्र भेटीला संमती दिली, असा दावा करत पत्नीने न्यायालयाचे दार ठोठावले.

सुट्टीकालीन न्या. अमित जामसंडेकर यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली. मुलगा पतीसोबत असताना सासू घरात नसावी, असा युक्तिवाद पत्नीने कुटुंब न्यायालयात केला होता. त्यांची कुटुंब न्यायालयाने केवळ नोंद करून घेतली. कोणत्याही प्रकारची अट घातलेली नाही. मुळात सासूला घराबाहेर ठेवण्याची मागणी अयोग्यच आहे, असे स्पष्ट करत न्या. जामसंडेकर यांनी पत्नीची याचिका फेटाळून लावली.