विश्वचषकानिमित्त हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यामुळे हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान उद्या, रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक अवधित अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील गाडय़ा सीएसएमटी आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तसेच हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत ब्लॉक असेल.