चार ठिकाणी सकाळी दोन तास कबुतरांना दाणे टाकता येणार, स्वयंसेवी संस्थांवर व्यवस्थापनाची जबाबदारी

मुंबईत कबुतरांना सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे टाकता येणार आहेत. यासाठी पालिकेने मुंबईत चार ठिकाणे निश्चित केली आहे. या ठिकाणच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांवर राहणार आहे. विद्यमान कबुतर खाने मात्र बंदच राहणार आहेत.

कबुतरखान्यांबाबत, नागरिकांच्या हरकती / सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही माननीय न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, कार्यवाही करुन, मुंबईत (1) जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हायर), (2) के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम, (3) टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली – मुलुंड जकात नाका, ऐरोली – मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व), आणि (4) आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार

कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे वाहने व पादचारी यांना अडथळा होवू नये, कबुतरखान्याच्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणे, या सर्व बाबींची दक्षता संबंधित संस्थेला घ्यावी लागेल. त्याअनुषंगाने संस्थेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाणार आहे. कबुतरखान्यांच्या या व्यवस्थापनामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त हे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) असतील.