
मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्यासाठी पालिका आता ‘रस्ते दत्तक’ योजना राबवणार आहे. यामध्ये 730 हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकावर किमान तीन रस्त्यांची देखभाल-स्वच्छतेची जबाबदारी असेल. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे अडीच हजार किमीचे शेकडो रस्ते आहेत. या रस्त्यांच्या मजबुतीकरिता सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मोहीम पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या रस्त्यांचे मजबुतीकरण राखण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार रस्त्यांच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यानुसार आता रस्ते दत्तक उपक्रमात रस्त्यांचा दर्जा, शाश्वत स्वच्छता, धुळमुक्ती आणि नियमित देखभाल सुनिश्चित करण्यात येणार आहे.
असा राबवणार उपक्रम
- ‘दत्तक रस्ते’ उपक्रमात कनिष्ठ पर्यवेक्षक आपल्या दत्तक घेतलेल्या रस्त्यांवर स्वच्छता आणि सौंदर्यवर्धनाची जबाबदारी पार पाडेल.
- या उपक्रमांतर्गत, प्रत्येक कनिष्ठ पर्यवेक्षक नियमित स्वच्छता आणि देखभालीसाठी किमान तीन प्रमुख रस्ते किंवा मार्ग दत्तक घेतील.
- यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागाची संपूर्ण स्वच्छता करणे, रस्त्यावर पडलेले टाकाऊ पदार्थ, बांधकाम राडारोडा आदींचे निर्मूलन करण्यात येईल.


























































