
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिह्यातील काशीबुग्गा स्थित वेंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला. तर, अनेक लोक जखमी झाले. या प्रकरणी मंदिराचे मालक हरी मुकुंद पांडा यांच्या विरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकादशीच्या निमित्ताने वेंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी आज सकाळच्या सुमारास रीघ लागली होती. मंदिरात प्रवेश करण्याच्या शिडीवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीच्या रेट्यामुळे शिडीला लावण्यात आलेल्या स्टीलच्या ग्रीलवर भार पडला आणि त्या भाराने ग्रील तुटली. ग्रील तुटल्यामुळे लोक एकमेकांवर पडले. या घटनेमुळे घबराट पसरली आणि भाविक धावू लागले. त्यामुळे आणखीच बिकट परिस्थिती झाली. त्यात 12 जणांना जीव गमवावा लागला.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. या घटनेत जखमी झालेल्यांना सरकारी खर्चाने आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री नायडू यांनी दिले.





























































