कंबोज-सुथारचा यशस्वी पाठलाग; दक्षिण आफ्रिकन ‘अ’ संघाविरुद्ध थरारक कसोटी विजय

कधी कधी क्रिकेट ही फक्त चेंडू आणि बॅटची झुंज नसते, ती धैर्य, संयम आणि विश्वासाची कसोटी असते. बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर हिंदुस्थान ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यात झालेला चारदिवसीय कसोटी सामन्यात अंशुल कंबोज आणि मानव सुथार यांनी तेच धैर्य आणि संयम दाखवत केलेल्या 52 धावांच्या भागीने संघाला अवघ्या तीन विकेटनी थरारक विजय मिळवून दिला. या विजयामुळे हिंदुस्थान ‘अ’ संघाने दोन अनौपचारिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

काल दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 199 धावांत गुंडाळला तेव्हा हिंदुस्थानी संघाच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पहिल्या डावातील 75 धावांच्या आघाडीने हिंदुस्थानला 275 धावांचा पाठलाग करायचा होता. पण काल 3 बाद 39 अशी केविलवाणी अवस्था झाली तेव्हा ‘आता तर संपलं!’ असं वाटलं होतं. पण कर्णधार ऋषभ पंतने आपल्या स्टाईलने सामन्यात जान आणली. त्यांच्या खेळीने हिंदुस्थान सहज विजय गाठणार असे चित्र होते, पण तो आज 90 वर बाद झाला आणि सारे चित्र पालटलेय पुढे 7 बाद 215 अशी धोकादायक स्थिती झाली. आफ्रिकन संघ प्रंटफूटवर आला होता. त्यांच्या गोलंदाजांनी संघांना विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उभ्या असलेल्या मानव सुथार आणि अंशुल पंबोजला डोक्यावर चेंडू टाकले. पण हे दोघही  ‘आम्ही आहोत ना!’ अशा आत्मविश्वासाने लढले आणि सामना आपल्या बाजूने खेचला. कालच्या 4 बाद 119 वरून पंतने आयुष बदोनीसह 53 धावांची भर घातली. पंत बाद झाल्यावर बदोनीलाही वॅन वुरनने बाद करून हिंदुस्थानी संघाला अडचणीत आणले. दोन्ही डावांत 8 विकेट घेणाऱ्या तनुष कोटियननेही 23 धावांची खेळी करत आपलेही योगदान दिले.