
भांडवलदारांच्या फायद्यासाठी हिंदी सक्तीच्या आडून महाराष्ट्रात मराठीचा बळी देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आज पालघरमध्ये झालेल्या मराठीकारण परिषदेत मान्यवरांनी केला. कोणत्याही परिस्थितीत हिंदी सक्तीची गळचेपी सहन करणार नसून वेळप्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसू, असा इशाराही देण्यात आला आहे. मराठी बांधवांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
मराठी वाचवू समितीच्या वतीने नवली येथील गोविंदराव ठाकूर सभागृहात आज मराठीकारण परिषद पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ शिक्षकतज्ज्ञ डॉ. दीपक पवार यांनी शिक्षण व्यवस्था आणि सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मराठी भाषा आणि महाराष्ट्राची ओळख संपवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून सरकारने अनुदानित शाळांकडे पाठ फिरवली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे पालकांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या परिषदेस अभिनेत्री चिन्मय सुमित, प्राध्यापक रमेश पानसे, गिरीश सामंत, रमाकांत पाटील, जितेंद्र राऊळ, सुशील सेजुळे आदी उपस्थित होते. सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी सविस्तर पुस्तिका प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती या परिषदेत देण्यात आली. यावेळी परिषदेत डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच त्रिभाषा सूत्राच्या अंमल बजावणीसंदर्भात ही समिती अनावश्यक असून ती तत्काळ बरखास्त करण्यात यावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.




























































