अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडाले

अलिबाग समुद्रात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे. शशांक सिंग आणि पलाश पखर अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघे आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी फिरायला गेले होते. त्यांचा मृतदेह अद्यापही सापडला नसून पोलीस आणि जीवरक्षक त्याचा शोध घेत आहेत.

नवी मुंबईत राहणारे चार मित्र अलिबाग समुद्रकिनारी गेले होते. यातील एका तरुणाने पोहण्यासाठी समुद्रात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्रही समुद्रात गेला असता दोघेही बुडाले. सहकाऱ्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही पाण्यात कुठेच दिसून आले नाहीत. अखेर याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना मिळाली. त्यानुसार अलिबाग पोलीस आणि जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. ड्रोन आणि बॅटरीच्या सहाय्याने तरुणांना शोधण्याचा प्रयत्न केला. अंधार असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. रविवारी सकाळपासून तरुणांचा शोध सुरू असून अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.