
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील निकालाचा क्रम बदलल्याने अनेक विद्यार्थ्यांची संधी हुकली असा दावा करत पुण्यातील एका विद्यार्थिनीने याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले. राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील तिसऱया फेरीच्या निकालाचा क्रम बदलला. आधी ‘ग्रुप अ’ (एमबीबीएस/बीडीएस) चे निकाल जाहीर होतात. त्यानंतर ‘ग्रुप ब’ (बीएएमएस/बीएचएमएस/बीयूएमएस) अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होतात. पण यावेळी ग्रुप बचे निकाल ग्रुप अच्या निकालाआधी जाहीर करण्यात आले. पुण्यातील विद्यार्थिनी पूर्वा वाघ हिने याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात ऍड. राहुल कामेरकर यांच्यामार्फत याचिका दाखल करत या बदलामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला याचिकेवर उत्तर सादर करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली.


























































