खोडाळा आरोग्य केंद्रात आता 24 तास कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठवणार

खोडाळा आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या बेडवर कुत्र्याने मुक्काम ठोकल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता या केंद्रामध्ये 24 तास कर्मचारी ठेवण्यात येणार असून वैद्यकीय अधिकारी वर्षा घोडेवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याने आरोग्य केंद्राची सुरक्षा अधिक भक्कम होणार असून कुत्र्यांचा वावरही बंद होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अतिदुर्गम भागातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. आदिवासी क्षेत्रातील आरोग्य व्यवस्था आधीच सलाईनवर असताना खोडाळ्याच्या केंद्रात रुग्णांच्या बेडवर चक्क कुत्र्याने मुक्कम ठोकल्याचे वृत्त 3 नोव्हेंबर रोजी दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केले होते. याबाबतचा व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल होताच आरोग्य प्रशासनाची पळापळ सुरू झाली. विशेष म्हणजे मोखाड्यात गॅस्ट्रोची साथ सुरू असताना हा प्रकार घडला.

‘रुग्णाऐवजी बेडवर कुत्र्याचा मुक्काम’ हे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी त्याची दखल घेतली. तसेच वैद्यकीय अधिकारी वर्षा घोडेवार यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. 24 तास त्या ठिकाणी कर्मचारीही ऑन ड्युटी राहणार आहेत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.