
अलिबाग तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले आहे. रस्त्यांच्या या दुर्दशेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ दिवसांत रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेले पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्यासाठी देण्यात येणार आहेत.
खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वारंवार वाहतूककोंडी निर्माण होत आहे. मात्र खड्डे बुजवण्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सुरुवातीला गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते. मात्र गणेशोत्सव व त्यानंतर दीपावली सणही संपला असून खड्ड्यांची स्थिती जैसे थे आहे.
शिवसेनेचे जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव व शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठत १५ दिवसांत खड्डे न भरल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिवसेनेचे अलिबाग विधानसभा मतदारसंघ प्रवक्ते धनंजय गुरव, कार्यालयप्रमुख सुरेश झावरे उपस्थित होते.






























































