
मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱयांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यांवर रेल कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, कर्मचाऱ्यांवरील अन्यायकारक कारवाई खपवून घेणार नाही. कर्मचाऱ्यांविरोधातील संबंधित गुन्हे तातडीने मागे घ्या, अन्यथा शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रेल कामगार सेनेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 9 जून रोजी लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातप्रकरणी रेल्वेच्या दोघा अभियंत्यांसह इतर कर्मचारी-अधिकाऱ्यांविरुद्ध ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर तीव्र पडसाद उमटले असून रेल्वे कर्मचाऱयांना नाहक गुह्यात गोवण्याच्या षड्यंत्राचा रेल कामगार सेनेने निषेध केला. शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या आदेशावरून कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव (बाबी) यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यालाच अनुसरून मुंब्रा अपघाताच्या चौकशीतील गोलमाल आणि नियोजित कारवाईचा रेल कामगार सेनेने तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदवला. रेल्वे अपघात बहुआयामी व तांत्रिक बाबींचा परिणाम असतात. त्यासाठी केवळ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविणे चुकीचे आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांवरील कारवाई तत्काळ थांबवावी, अन्यथा संघटना शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करेल आणि त्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची असेल, असा इशारा रेल कामगार सेनेने दिला आहे.
काहींना वाचवण्यासाठी तपास दुसऱ्या यंत्रणेकडे!
मुंब्रा अपघाताचा तपास व्हीजेटीआयकडे सोपवणे, त्या संस्थेच्या चौकशी अहवालात रेल्वे कर्मचारी–अधिकाऱ्यांना थेट दोषी ठरविणे, त्याआधारे जीआरपीमार्फत एफआयआर दाखल करून अटक वॉरंट जारी करणे या सर्व बाबी अत्यंत चुकीच्या आणि अन्यायकारक आहेत. ही प्रक्रिया न्यायाच्या मूलभूत तत्त्वांना धरून नाही. कोणत्याही तांत्रिक तपासणी अहवालाच्या आधारे रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे पूर्णपणे चुकीचे आहे. रेल्वेकडे सक्षम तपास यंत्रणा असताना कोणाला तरी वाचविण्यासाठी तपास दुसऱ्या यंत्रणेकडे दिला, असा दावा रेल कामगार सेनेने केला आहे.





























































