भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने दाम्पत्याला चिरडले, दोघांचा मृत्यू तर चिमुरडी गंभीर

उत्तर प्रदेश शाहजहांपुर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बुधवारी रात्री एक भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने रस्त्याशेजारी झोपलेल्या दाम्पत्याला चिरडल्याची घटना घडली आहे. जिथे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांची 10 वर्षांची नात वंदना गंभीर जखमी झाली.

ही दुर्घटना पुवाया-निगोही मार्गावर सुनारा बुजुर्ग गावात घडली. ट्रॅक्टर ट्रॉली विटांनी भरलेली होती आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबावर आदळली. मृतांची ओळख पटली आहे. 48 वर्षीय रामशंकर आणि त्यांची 45 वर्षीय पत्नी तारावती. ते त्यांच्या घराबाहेर उघड्यावर झोपले होते, तर त्यांची नात वंदना जवळच झोपली होती. या अपघातामुळे गावात मोठी घबराट पसरली आणि रहिवाशांनी तातडीने पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, अपघातानंतर ट्रॅक्टर-ट्रॉली चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणात वाहन जप्त करण्यात आले असून जखमी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोखून निषेध करत आरोपी चालकाला अटक करण्याची मागणी केली. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी ग्रामस्थांना शांत करुन कठोर कारवाईचे आश्वासन दिले, त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. स्थानिक रहिवाशांच्या मते, रस्त्याच्या कडेला वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे यापूर्वीही असेच अपघात झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि चालकाला अटक करण्यासाठी एक पथक तयार केले आहे.