नवजात बाळाच्या उपचारासाठी शिव आरोग्य सेनेचा मदतीचा हात

शिव आरोग्य सेनेच्या प्रयत्नामुळे श्वसनाच्या आजाराशी झुंजत असलेल्या नवजात बाळाला वाडिया रुग्णालयात तत्काळ दाखल करून घेण्यात आले आहे. शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांनी रुग्णालयात जाऊन बाळाच्या नातेवाईकांना धीर दिला तसेच या अडचणीच्या काळात शिवसेना आपल्यासोबत आहे, असे आश्वासन दिले.

 नाशिकमधील निओ केअर रुग्णालयात  अमृता बाविस्कर यांनी  बाळाला जन्म दिला. या बाळाला जन्मतः श्वसनाचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाला Vains of Galen malformation याचा (हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडचण) त्रास आहे. उपचारासाठी डॉक्टरांनी त्यांना मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. परंतु बाळाचे वडील स्वप्नील बाविस्कर यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचाराचा महागडा खर्च त्यांना परवडणारा नव्हता.

कळवण शिवसेना तालुकाप्रमुख विनोद मालपुरे यांच्या सूचनेनुसार कुणाल कुडे यांनी आपली भाची अमृता हिच्याबाबत शिव आरोग्य सेनेचे मुंबई सहसमन्वयक प्रकाश वाणी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य सेनेचे सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांनी याबाबत वाडियाचे डॉक्टर व प्रशासनाशी चर्चा केली. त्यानुसार, अत्यावश्यक केस म्हणून या बाळाला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.

शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन बाळाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस जितेंद्र सकपाळ, मुंबई सचिव ज्योती भोसले, मुंबई सह समन्वयक प्रकाश वाणी, शिवडी विधानसभा समन्वयक अनंत कोटकर, चंद्रकांत हळदणकर उपस्थित होते.