
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले आहे. गुरुवारी 18 जिल्ह्यातील 121 जागांसाठी तब्बल 64.69 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात झालेले गेल्या 75 वर्षांतील हे विक्रमी मतदान आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात तब्बल 8.5 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र मतदारांचा हाच उत्साह एनडीएसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. कारण बिहारमध्ये जेव्हा जेव्हा 5 टक्के मतदान वाढल्याचे दिसून आले तेव्हा सत्तापरिवर्तन झाले आहे.
बिहारमध्ये यंदा मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले आहे. 2020 मध्ये पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 56.1 टक्के मतदान झाले होते, तर यंदा 121 जागांसाठी 64.69 टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 8.5 टक्के वाढ झाल्याने सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. कारण वाढलेल्या मतदानाचा थेट परिणाम निकालावर होतो.
हिंदुस्थानातील राजकीय इतिहासात पाहता वाढलेले मतदान हे सामान्यत: सत्ताविरोधी लाट अर्थात अँटी इन्कमबन्सीचे प्रतिक असते आणि जनतेला आता बदल हवा आहे असे मानले जाते. बिहारमध्ये याआधी 1967, 1980 आणि 1990 च्या विधानसभा निवडणुकीत 5 टक्क्यांहून अधिक मतदान वाढले होते. त्यावेळी सत्ताधारी पक्षाला पायउतार व्हावे लागले होते आणि नवीन सरकार स्थापन झाले होते.
एसआयआरनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असून अनेक मतदारांची नावे कापण्यात आल्याचे समोर आले होते. तर काही नावे नव्यानेही समाविष्ट करण्यात आली होती. त्यामुळे याचा फायदा एनडीएला होतो, की महागठबंधनला हे आता निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. मात्र बिहारमध्ये वाढलेले मतदान बदल घडवते हा इतिहास आहे.
बिहारमध्ये 65 टक्के मतदान; दगडफेक, शेणफेक आणि बहिष्काराचे गालबोट
– बिहारमध्ये 1967 ला पहिल्यांदा मतदानात वाढ झाली होती. 1962 ला 44.5 टक्के, तर 1967 ला 51.5 टक्के मतदान झाले होते. मतदाना 7 टक्के वाढ झाली होती आणि काँग्रेसचे सरकार पडले होते.
– 1967 नंतर 1980 मध्येही हाच पॅटर्न पाहायला मिळाला. 1980 मध्ये 57.3 टक्के मतदान झाले होते, तर त्याआधी 1977 ला 50.3 टक्के मतदान झाले होते. याचाच अर्थ मतदानात 6.8 टक्के वाढ झाली आणि याचा फायदा काँग्रेसला झाला. जनता पार्टीचे सरकार पडले आणि काँग्रेसने सरकार स्थापन केले.
– 1980 नंतर 1990 मध्येही मतदानाचा टक्का वाढला होता. 1990 मध्ये 62 टक्के मतदान झाले, तर 1985 ला 56.3 टक्के मतदान झाले होते. मतदानात 5.8 टक्के वाढ झाली होती. त्यावेळीही सत्तापरिवर्तन झाले आणि काँग्रेसचे सरकार जाऊन जनता दल सत्तेवर आले.




























































