मतदान केंद्राबाहेर शिवसेना बोगस मतदारांच्या नावाचे बॅनर लावणार; बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी शिवसेनेची मोहिम

बोगस आणि दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्राबाहेर बोगस आणि दुबार मतदारांची नावे असणारा बॅनर लावणार आहे. त्यामुळे बोगस मतदानाला चाप बसणार आहे. रत्नागिरी शहरात मतदान केंद्राबाहेर असे बॅनर लावण्याचा निर्णय शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.

माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, उपनेते माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत उपस्थित होते. यावेळी शहरातील १६ प्रभागांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी रत्नागिरी शहरातील बोगस आणि दुबार मतदार नोंदणीवर चर्चा झाली. यावेळी मतदान केंद्राबाहेर बोगस मतदार, मयत मतदार आणि दुबार मतदारांची नावे एका बॅनरवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक मतदान केंद्रांवरील बोगस,दुबार आणि मयत मतदारांबाबत पोलिंग एजंटला माहिती देऊन त्याला सतर्क करण्याच्या सूचना शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित मताधिक्य मिळाले नसले तरी ती कमतरता या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत आपण भरून काढू. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर नगरपरिषद आणि देवरूख, लांजा नगरपंचायतीत मिळून आपण एक लाखाचे मताधिक्य घेऊ असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

सामंताच्या विरोधात बाळ मानेंची मोहिम

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उपनेते बाळ माने यांनी एक मोहीम उघडली आहे. रत्नागिरीतील अनेक प्रकरणे त्यांनी उघडकीस आणून आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेला गतवैभव मिळवून देणार

गेल्या काही वर्षात अनेक जण आपला पक्ष सोडून गेले त्याची चिंता करू नका.मी एक वर्षापूर्वी मनगटात हे शिवबंधन बांधले ते लाईफटाईम आहे. शिवसेनेचे गतवैभव आहे ते मी परत मिळवून देईन. या राज्यकर्त्यांना शहरवासिय कंटाळले आहेत.पुढचे काही दिवस आपल्याला महत्वाचे असून जागरूकपणे आपण निवडणुका लढवू आणि आपला भगवा फडकवू असे सांगितले.

शिवसेनेत जोरदार इनकमिंग

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी रत्नागिरी शहरातील पंकज पुसाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.शहरात आता शिवसेनेत इनकमिंगचा धडा सुरू होणार असे सूचक विधान उपनेते बाळ माने यांनी केले.