उधळपट्टीला चाप! फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी

राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील तीन पक्षांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून खटके उडत आहेत. आता मंत्र्यांच्या बंगल्यावरील पैशांच्या उधळपट्टीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर सुरू असलेल्या पैशाच्या उधळपट्टीवरून फडणवीस यांनी शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडात असताना आणि कर्जाचा भलामोठा डोंगर असताना विधानसभेच्या अध्यक्षांच्या बंगल्यावर 1 कोटी 25 लाख, विधान परिषदेचे सभापती यांच्या बंगल्यावर 1 कोटी 10 लाख, तसेच कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या बंगल्यावर 1 कोटी 10 लाखाचा निधी केवळ इंटिरिअर, डागडुजी व फर्निचर यासाठी खर्च केला जाणार होता. याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. कोणत्याही मंत्र्याच्या बंगल्यावर 35 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करायचा नाही, असे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या बंगल्याचे काम आता 35 लाखातच पूर्ण करावे लागणार आहे.

अतिवृष्टीने शेतकऱ्याचे हाल अन् कृषीमंत्र्यांचा राजेशाही थाट!

अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी अजूनही मदतीच्या अपक्षेत आहेत. पिकासह शेतजमीन खरवडून गेल्याने बळीराजाच्या घरात खायला अन्नाचा कण नाही. पण हिवाळी अधिवेशनासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मात्र राजेशाही थाट समोर आला आहे. दत्तात्रय भरणे यांच्या बंगल्यावर ७५ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उधळपट्टीचा तपशील समोर आल्यावर फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

कृषीमंत्री भरणेंच्या बंगल्यावर असा होणार होता खर्च 

बंगल्याच्या छताची संपूर्ण दुरुस्ती, टाईल्स बदलणे, फेब्रिकेशन सिलिंग, लोखंडी ढाचा (5 लाख), टाईल्स (7 लाख), प्लंबिंग (3 लाख), पेंटिंग आतून-बाहेरून (4 लाख), अल्युमिनियम खिडक्या (2.50 लाख), नळ फिटिंग व कंपन्यांचा महागडा खर्च (3 लाख), बाहेरील सिलिंग सीट (5 लाख), इलेक्ट्रिक फिटिंग (5–7 लाख), फर्निचर (15 लाख), आतील सिलिंग (12 लाख), दरवाजे (10–12 लाख), वुडन फ्लोरिंग (10 लाख), पडदे, गाद्या व इतर किरकोळ खर्च यांचा समावेश होता.