शिवरायांच्या स्मारकाजवळची जागा हडपण्याचा डाव शिवसैनिकांनी उधळला, बेकायदा बांधकाम तोडून टाकले

नालासोपाऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या स्मारकाला लागूनच असलेली जागा हडप करून तेथे कार्यालय थाटण्याचा शिंदे गटाचे पदाधिकारी संजय मोरे यांचा डाव शिवसैनिकांनी उधळून लावला. या अतिक्रमणाबाबत शिवप्रेमींच्या तक्रारी होत्या. स्थानिक रहिवाशांच्याही तक्रारी होत्या. त्याची दखल घेत शिवसैनिकांनी तातडीने धाव घेऊन ते अतिक्रमण तोडून टाकल्याने स्मारकाने आता मोकळा श्वास घेतला आहे.

नालासोपारा पूर्वेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे स्मारक गेली ३५ वर्षे मोठ्या दिमाखात उभे आहे. असंख्य शिवप्रेमी तेथे जाऊन नतमस्तक होतात. गुरुवारी मध्यरात्रीनंतर रात्रीच्या अंधारात शिंदे गटाचे पदाधिकारी संजय मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरात अतिक्रमण करून रातोरात स्वतःचे कार्यालय थाटले. विशेष म्हणजे स्मारकाच्या आत भिंत बांधून तेथील जागाही बळकावण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिकांना ही बाब समजताच शिवसेना शहरप्रमुख रोहन चव्हाण, युवासेना जिल्हा चिटणीस करण चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदीप चव्हाण, शहर संघटक रुचिता विश्वासराव, शाखाप्रमुख कुशल बोस, अभिजित चव्हाण यांनी तातडीने जाऊन रात्रीच्या अंधारात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केलेले बेकायदा बांधकाम पाडून टाकले ट आणि महापुरुषांचे स्मारक अतिक्रमणमुक्त केले.