पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, अजित पवार म्हणतात… एक रुपयाही न भरता खरेदीखत झालेच कसे?

पुत्र पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक रुपया न भरता खरेदी खताचा कागद कसा तयार झाला? हे पाहून मी स्वतःही आश्चर्यचकित झालो असे वक्तव्य केले. यापुढे माझ्या नातेवाईकाने सहकार्याने किंवा अधिकाऱ्याने माझ्या नावे काही सांगितले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये आणि चुकीचे काम करू नये असे म्हटले आहे.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याबाबत काही खुलासे केले. ते म्हणाले, मधल्या काळात काही घटना घडल्या, त्याची चौकशी सुरू आहे. एका महिन्यात वस्तुस्थिती समोर येईल. एक रुपया न भरता कागद कसा तयार झाला हे पाहून मी स्वतःही आश्चर्यचकित झालो. नेमके काय झाले हे लवकरच समोर येईल. पण निवडणुका सुरू झाल्या की, आरोपांची मालिका सुरू होते. आधीही आमच्यावर आरोप झाले, पण त्यातून काहीच पुढे आलं नाही. बदनामी मात्र होते.

अजित पवार म्हणाले, घटनेचा आदर करायचा आहे. चुकीचं झालं तर त्यावर बोलू शकतो, पण प्रत्येक वेळी बारामतीचं नाव पुढं करून राजकारण करायची पद्धत अयोग्य आहे. मी कधीही चुकीचे केले नाही आणि पुढेही करणार नाही. राजकारणात अनेक चढ-उतार आले, पण मी समाधानी आहे. काम करून दाखवणं हीच माझी ओळख आहे, मुख्यमंत्र्यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत घेतले आहेत, त्यामुळे महिन्याभरात वस्तुस्थिती समोर येईल असे ते म्हणाले.

जमिनीबाबत तक्रार असल्यास चौकशी करा

बारामतीत मी काही संस्थांसाठी किंवा माझ्या नातेवाईकांनी चुकीचे काम करून जमिनी घेतल्याचा आरोप काहींनी केला आहे. मेडद येथील खरेदी-विक्री संघाच्या जागेबाबत, सोनगाव येथील जागेबाबत प्रश्न उपस्थित झाले. वास्तविक मेडदची जागा संघाने 1994 ला प्रस्ताव दिला होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 2003 साली संघाला दीड लाख रुपयांना ही जमिन मिळाली. 2020 साली आम्ही तेथे संघाचा पेट्रोलपंप सुरू केला. मंगल कार्यालय, गोडावून अशा गोष्टी करायच्या आहेत. तरीही काही जण आरोप करत आहेत. त्यांनी कागदपत्रे असतील तर संबंधितांकडे तक्रार करावी, चौकशी व्हावी आणि जो कोण दोषी असेल तर त्याच्यावर एफआयआर दाखल व्हावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.