हजारो पालीवासीयांचे आरोग्य धोक्यात

बेशिस्त नागरिकांमुळे तीर्थक्षेत्र पाली शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. घंटागाड्यांची सुविधा असूनही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असल्याने रस्त्यांना डम्पिंगचे स्वरूप आले आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले असून तेथे घूस, डास व भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पावसामुळे रस्त्यावरील कचरा कुजला असून शहरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पालीतील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी नगरपंचायतीकडून काही वर्षांपूर्वी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. पाच घंटागाड्यांच्या मदतीने शहरातील विविध भागांतून कचरा गोळा केला जातो. तसेच नगरपंचायतीकडून ठिकठिकाणी सूचना फलक लावून सक्त मनाईचे आदेश लावले आहेत. मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवत काही बेशिस्त नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा फेकत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या बेशिस्त नागरिकांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून शहरात जनजागृती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य

शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले असून रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तसेच प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांमुळे शहरातील नाले आणि गटारेही कचऱ्याने तुंबली आहेत. या उघड्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला अशी रोगराई पसरली असून नागरिक हैराण झाले आहेत.