MCA च्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कार्यभार अजिंक्य नाईक सांभाळणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी, अॅपेक्स कौन्सिल आणि टी-20 मुंबई गव्हर्निंग कौन्सिलच्या निवडणुका 12 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे प्रसाद लाड या प्रमुख नेत्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना या सर्व नेत्यांनी माघार घेतली आणि अजिंक्य नाईक यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड यांच्याव्यतिरिक्त एकमेव क्रिकेटर उमेदवार डायना एडल्जी यांचा सुद्धा समावेश होता. डायना एडल्जी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला. तसेच अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या शाहआलंम शेख यांनी दाखल केली होती. कुलिंग पीरियडच्या नियमानुसार अजिंक्य नाईक निवडणूक लढवू शकत नाहीत, असा दावा याचिकेमध्ये शाह आलंम शेख यांनी केला होता. मात्र, सचिव आणि अध्यक्षपद यांचा कार्यकाळ एकच असल्याने कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालं नसल्याचा दावा अजिंक्य नाईक यांनी केला होता. मात्र, या याचिकेवरील सुनवाणी पूर्ण झाली असून शहर दिवाणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतर पदांसाठी 12 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी 9, सचिवपदासाठी 10, सहसचिवपदासाठी 9, खजिनदारपदासाठी 8 आणि कार्यकारिणी पदासाठी 48 अर्ज दाखल झाले आहेत.