
वरळीपाठोपाठ आता नायगाव बीडीडीवासीयांच्या अलिशान घराची स्वप्नपूर्ती होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 864 कुटुंबीयांना चावी वाटप करण्यासाठी म्हाडाने मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी उद्या, बुधवारची तारीख निश्चित केली असून माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात चावी वाटपाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे वर्षानुवर्षे 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 500चौरस फुटाचे अलिशान घर मिळणार आहे.
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे बांधकाम कंत्राटदार एल अॅण्ड टी यांच्यामार्फत सुरू आहे. या प्रकल्पाचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 8 मधील टॉवर क्र. 4 ते 8 या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या रहिवाशांना दिवाळीत घरे देण्याचे म्हाडाचे नियोजन होते. त्यादृष्टीने म्हाडाने तयारी केली होती. पण भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे दिवाळीचा मुहूर्त हुकला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारची तारीख निश्चित केली असली तरी वेळ अद्याप निश्चित केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
23 मजली पुनर्वसन इमारती
नायगाव बीडीडी येथील 42 चाळींचा पुनर्विकास करून 3344 रहिवाशांचे पुनर्वसन 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 तर दुसऱ्या टप्प्यात 12 पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत.





























































